" थेंब "
मी पाहिलेत थेम्ब, घामाचे
कपाळापासून नाकापर्यंत येणारे
आणि शेवटी जमिनीवर पडणारे
माझे कपडे ओले झालेत
जेव्हा मी शेतामधे काम करीत होतो
माझ्या परिवारातील विनापगारी मजुरांसोबत
मी पाहिलेत थेंब, अश्रुंचे
डोळ्यांतून गालांवर पसरणारे
आणि शेवटी पुसले जाणारे
माझं हृदय रडत होतं
जेव्हा मी माझ्या आईला पहात होतो
निर्दयी बापाने तिला काठीने मारताना
मी पाहिलेत थेंब, पाण्याचे
आकाशातून पृथ्वीवर कोसळताना
आणि शेवटी मातीत मुरताना
माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू निघालेत
जेव्हा मला सुखाने भरभरून आले
गरीब शेतकऱ्यांचा आनंद पाहताना
मी पाहिलेत थेंब, तेजाबाचे
बाटलीतून एका निर्दोष मुलीच्या चेहऱ्यावर
टाकताना
आणि शेवटी तिचा चेहरा जळताना
माझ शरीर थरथरत होतं
जेव्हा मी तो क्षण अनुभवत होतो
तिच्या असहाय्य, दीन अवस्थेचा
मी पाहिलेत थेम्ब, प्रेमाचे
हृदयापासून एका गरजवंतापर्यंत जाताना
आणि शेवटी त्याला स्वीकारताना
माझं मन समाधानी झालं
जेव्हा मी ही गोष्ट करीत होतो
कुण्या गरजूच्या आशेला पूर्ण करून.
#प्रफुल्लशिंदे, अकोला
No comments:
Post a Comment